सिनेरिव्ह्यू चित्रपट : छापा काटा

0
--------------------------------------------------
अभिनेता : मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, तेजस्विनी लोणारी, रीना मधुकर, ऋतुराज फडके, पंकज विष्णु
दिग्दर्शक: संदीप नवरे
प्रकार/शैली: (विनोदी - कौटुंबिक नाट्य )Comedy, Drama
कालावधी:2 Hrs 24 Min
क्रिटिक रेटिंग
३.५/५
--------------------------------------------------
          मुंबई (प्रतिनिधी) - मकरंद अनासपुरे म्हणजे पोटभरून हसण्याची १०० टक्की खात्री.  "कायद्याच बोला, गाढवाचं लग्न, जाऊ तिथं खाऊ, गल्लींत गोंधळ, दिल्लीत मुजरा, गुलदस्ता, दे धक्का, सगळं करून भागलं अशी उलाढाल" आपण पाहून मनमुराद हसलो आहोत. अशीच खसखर पिकवणारा त्याचा छापा काटा हा नवाकोरा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. 'मेलोड्रामा'नं खच्चून भरलेलं कथानक असलेल्या हा धम्माल विनोदी चित्रपट मकरंदच्या टिपिकल पठडीतला असल्याने निखळ मनोरंजन अपेक्षित असलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी 'छापा काटा' हा अलीकडच्या मराठी सिनेमांहून काहीसा वेगळा म्हणता येईल. टिपिकल टाळी घेणारी वाक्यं, मिश्किल आणि खुसखुशीत संवाद, तगड्या कलाकारांची जुगलबंदी, मोनोलॉग आणि उत्कंठावर्धक क्लायमॅक्सनंतर होणारं 'हॅपी एंडिंग'... असा रंगारंग माहोल लेखक - दिग्दर्शक संदीप मनोहर नवरे यांनी पडद्यावर रंगवला आहे. चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखा उठावदार झाल्या असून त्यातील कलाकारांनी आपापली पात्र तन्मयतेनं साकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. पात्रांच्या वर्तनानं पेच निर्माण होतात आणि केवळ वास्तविक दर्शन एवढाच हेतू न ठेवल्यामुळे हा सिनेमा निर्माण झालेल्या पेचांवर आपल्या परीनं उपायही सुचवतो. प्रसंगी पटकथेत तणाव निर्माण करत आणि मेलोड्रामा घडवत लेखक त्यामध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.
          सिनेमाचा नायक नामदेव उर्फ नाम्या (मकरंद अनासपुरे) लग्नाचं वय उलटून गेलेला अविवाहित आहे. त्याला तीन लहान बहिणी. वडिलांच्या पश्चात मोठ्या भावाचं कर्तव्य बजावत त्यानं दोन बहिणींच लग्न लावून दिलं आहे. आता घरातील शेंडेफळ असलेल्या अर्चनाचं (रीना मधुकर) लग्न व्हायचं बाकी आहे. तिच्या लग्नासाठीच नाम्या 'नाटक' रंगवतो. त्याचं झालंय असं की, प्रेमविवाह करू पाहणाऱ्या अर्चनाच्या होणाऱ्या सासऱ्यांना त्यांची सून ही श्रीमंतांच्या घरची हवी आहे. पण, आपला नाम्या मात्र विविध विमा, स्किम, योजना विकणारा एजंट. गोडीगुलाबीनं तो एकेकाला आपल्या विम्याच्या जाळ्यात ओढत असतो आणि घर चालवत असतो. पाहुण्यांना आपण गर्भश्रीमंत आहोत असं दाखवण्यासाठी नाम्या खोटं नाटक उभं करतो.

         दुसरीकडे सिनेमाच्या समांतर ट्रॅकवर आणखी एक 'नाटक' सुरू असतं. या नाटकातही नाम्या मध्यवर्ती भूमिकेतच असतो. नाम्या आणि शनायाचं (तेजस्विनी लोणारी) 'कॉन्ट्रॅक्ट मॅरेज' होतं. कारण, शनायाला तिच्या आजोबांची (मोहन जोशी) कोट्यवधी रुपयांची संपत्ती हवी असते. संपत्ती मिळवण्यासाठी तीसुद्धा नाम्यासोबत एक 'नाटक' उभं करते. आता सिनेमात एकाच वेळी दोन वेगवेगळी कथानकं असलेली समांतर दुहेरी-नाट्य सुरू असतात. आत हे 'नाटक' खरंच सुफळ-संपूर्ण होतं का? याचं उत्तर तुम्हाला सिनेमा बघूनच मिळेल. एकीकडे नाम्याचं गर्भश्रीमंत असल्याचं नाट्य आणि दुसरीकडे शनयाचं संपत्ती बळकावण्याचं नाट्य. दोन्हीकडे बरीच रंजक वळणं येतात. पडद्यावरील कलाकारांची जुगलबंदी लक्ष वेधून घेते. मामाच्या भूमिकेत असलेले विजय पाटकर त्यांच्या शैलीत प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी झाले आहेत.

        कथानकातील गोंधळ, घोटाळे आणि लपवाछपवीचा खेळ हे सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. लेखक-दिग्दर्शकानं सिनेमातील प्रत्येक पात्र फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच कलाकारांना आवश्यक तो मोकळेपणाही दिल्याचं जाणवतं. अनेक प्रसंग मजेशीर झाले असल्याने पडद्यावर हे 'नाट्य' पाहण्यात मजा येते. विनोदाचं अचूक टायमिंग आणि सेन्स असलेल्या कलाकारांमुळे संपूर्ण सिनेमा मेरी-गो-राऊंडप्रमाणे म्हणजे जत्रेतल्या आकाशपाळण्यासारखा फिरतो. बघण्याच्या टिपिकल कार्यक्रमापासून ते लग्न होण्यापर्यंतच्या घटनांची साखळी दृश्यं प्रेक्षकांना अनुभवता येतात. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका चांगली निभावली आहे. हा सिनेमा मकरंदच्या टिपिकल विनोदी मराठी सिनेमांच्या बाजासारखा आहे. सिनेमा तांत्रिक पातळीवर साधा-सरळ असून या सिनेमाचं शीर्षक 'छापा काटा' असं असण्याचं गुपित नाम्याच्या खिशात लपलेलं आहे. पोटभरून हसायला लावणारे हे नाणे हवेत उडवून तुम्ही हा 'सिनेमा' पाहायचा की नाही? हे ठरवू शकता.

सिनेमा : छापा काटा
निर्माता : सुशीलकुमार अग्रवाल
दिग्दर्शक : संदीप नवरे
लेखन : संदीप नवरे, प्रकाश भागवत
कलाकार : मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, तेजस्विनी लोणारी, रीना मधुकर, ऋतुराज फडके, पंकज विष्णु
संकलक : मीनल म्हादनाक
छायाचित्रण : गौरव पोंक्षे
दर्जा : साडेतीन स्टार

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)