पंढरपूर तालुक्यातील शाळांची जिल्हा न्यायाधीशांमार्फत तपासणी

0


         पंढरपूर (दि.9):- मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आदेश दिल्याने जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात येत आहे, खंडपीठाच्या आदेशान्वये पंढरपूर तालुक्यातील शाळांची जिल्हा न्यायाधीशांमार्फत तपासणी करण्यात आली असून, सदर तपासणीचा वस्तुनिष्ठ अहवाल समितीकडून उच्च न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे.


          शाळांची तपासणी करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून गट शिक्षणाधिकारी (पं.समिती) हे, तर प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, हे सदस्य म्हणून काम करत आहेत. या समितीकडून तालुक्यातील शाळांना भेटी देत तपासणी सुरू करण्यात आली आहे. तालुक्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी व्यवस्थापनाकडून 545 शाळा चालविल्या जात आहेत.

            समितीकडून तपासणीमध्ये प्रामुख्याने वर्गखोल्यांची स्थिती, शालेय परिसर स्वच्छता, मुला- मुलींचे स्वच्छतागृहे व त्यांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शाळेला होणारा उपद्रवी घटकांचा त्रास, शाळा परिसरातील अवैध व्यवसाय, तंबाखूमुक्त शाळा, शालेय इमारती व परिसराचा फक्त शैक्षणिक प्रयोजनासाठी उपयोग होतो किंवा नाही यासह इतर अनुषंगिक बाबी तपासल्या जात आहेत.

          समितीने  पंढरपूर नगरपालिकेच्या अधीनस्थ असलेल्या शाळा तसेच पंढरपूर तालुक्यातील कोर्टी, टाकळी, हाके वस्ती, लक्ष्‍मी टाकळी, गादेगांव, नेहरु नगर (गादेगांव) या जिल्हा परिषदेच्या शाळांना समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निंबकर, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे,  शिक्षण प्रशासन अधिकारी महेश पवार यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)