परदेशात "वास्तुशांती विधी" करणारे पंढरीतील "जोशी घराणे"

0
पंढरपूरच्या पुरोहिताने केला जर्मनीत वास्तुशांती विधी  

          पंढरपूर :- (प्रतिनिधी) आज संपूर्ण विश्वामध्ये भारतीय नागरिक उपजीविकेसाठी  वास्तव्य करीत आहेत. परदेशात राहत असताना आपली संस्कृती जपण्याची इच्छा काही अनिवासी भारतीयांची असते. पंढरपूरातील श्री. केदार जयंत देशपांडे हे जर्मनी येथील ब्रेमेन शहराजवळील ऑरीच या गावी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. श्री. देशपांडे यांनी ऑरीच येथे घर विकत घेतले आहे. घराची खरेदी केल्यानंतर श्री. केदार देशपांडे यांच्या मनात वास्तुशांती विधी करण्याचे आले. श्री.देशपांडे यांनी आपले पंढरपूर येथील  पाच पिढ्याचे कुलोपाध्याय श्री.दिलीपमहाराज जोशी यांच्याशी संपर्क साधला. श्री. दिलीपराव जोशी यांनी आपले चिरंजीव श्री. प्रशांत जोशी यांना वास्तुशांती विधी करण्यासाठी जर्मनीला पाठविण्याचे ठरवले.

         श्री. प्रशांत जोशी हे नुकतेच १० दिवसाचा आपला जर्मनीचा दौरा पूर्ण करून १ सप्टेंबर २०२३  रोजी पंढरपूरात परतले आहेत. मूळतः श्री. प्रशांत जोशी हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, पण त्यांनी आपला पारंपरिक ७ पिढ्यांचा संस्कृती जपणारा पौरोहित्य व्यवसाय  ते करीत आहेत. जर्मनीचा दौरा यशस्वी करून आल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रशांत जोशी म्हणाले, "मानवाने आपल्या सुखसोईसाठी पृथ्वीवर अतिक्रमण केले आहे. प्रत्येक जीवजंतूचा अधिकार पृथ्वीमातेवर आहे. एखादी वास्तू अथवा इमारत निर्माण होत असताना विविध जीवजंतूना हानी पोहचत असते. त्याचे प्रायश्चित्त करणे म्हणजे वास्तुशांती विधी आहे. आपला हिंदू धर्म सर्व जीवजंतूंचा विचार करणारा व आदर करणारा आहे.हि संस्कृती परदेशात राहूनसुध्दा जपण्याचे श्री. केदार देशपांडे यांनी ठरविले म्हणून मी जर्मनीला  जाण्याचे ठरविले. श्री.देशपांडे यांच्या  सत्कर्माला मी सहाय्य करू शकलो याचा मला विशेष आनंद आहे." श्री. प्रशांत जोशी यांच्या जर्मनी दौऱ्यामुळे पौरोहित्य क्षेत्रात विशेष कौतुक होत आहे. एका तीस वर्षीय पंढरपूरच्या पुरोहिताने पौरोहित्यासाठी जर्मनी दौरा करणे खरोखर अभिमानास्पद आहे. श्री.जोशी हे पंढरपूर शहरातील उमदेगल्लीत राहतात. १ सप्टेंबर २०२३ रोजी ते आपल्या घरी परतल्यावर गल्लीतील सर्व नागरिकांनी फटाक्याची आतषबाजी करून त्यांचे स्वागत केले. 
         श्री. प्रशांत जोशी हे पंढरपूर येथील  श्रीयाज्ञवल्क्य आश्रमाचे संचालक असून संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच वेदप्रसाद पाठशाळा पंढरपूरच्या विश्वस्तांनी श्री. प्रशांत जोशी यांचा सत्कार करून कौतुक केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)