अवघ्या जगाला २०२० ते २२ ही दोन वर्षे वेठीला धरणाऱ्या करोना महासाथीचे कवित्व अजूनही संपण्यास तयार नाही, हे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या करोना विषाणूच्या उगमासंदर्भातील अहवालावरून आणि त्या संदर्भात सुरू झालेल्या वादावरून दिसून येते आहे. अमेरिकेतील सगळय़ा प्रयोगशाळांचा समन्वयक म्हणून देखरेख करण्याचे काम ऊर्जा विभागाचे असते. त्या विभागाच्या ताज्या अहवालात ‘कोविड १९’ या विषाणूची गळती चीनमधल्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच झाली, असे ठोस विधान करण्यात आले आहे. या बातमीवर तातडीने इन्कार करून चीनने अमेरिका राजकीय डाव साधत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ‘कोविड १९’ हा विषाणू प्रयोगशाळेतून गळती होऊन जगभर पसरला, वुहानच्या मांसविक्री बाजारातून एखाद्या प्राण्यामार्फत एखाद्या माणसामध्ये संक्रमित झाला की नैसर्गिकरीत्या तयार होऊन जगभर पसरला यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. खरे तर ‘कोविड १९’च्या प्रादुर्भावापासूनच ही चर्चा सुरू झाली आणि ती सातत्याने होते आहे.
२०२१ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने पाठवलेले वैद्यकीय तज्ज्ञांचे एक पथक वुहानला जाऊन आले होते आणि त्याने वुहानच्या प्रयोगशाळेतून ‘कोविड १९’ची गळती झाली नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ऊर्जा खात्याच्या अहवालाचे महत्त्व अधिक. तरीही, घडून गेलेल्या या महासाथीवर आता एवढी चर्चा कशाला हा प्रश्न रास्तच. त्यावर संशोधक-अभ्यासकांकडून मिळणारे अपेक्षित उत्तर सर्वज्ञात आहे : जगात पुन्हा असे काही घडून नये म्हणून! जगभरात जवळपास ७० लाख लोकांचा बळी घेणाऱ्या ‘कोविड १९’ विषाणूचा उगम कसा आणि कुठे झाला या प्रश्नांचा शोध घेतला, तर त्या अभ्यासातून काहीएक दिशा मिळेल आणि पुन्हा अशी भयंकर महासाथ उद्भवू नये यासाठी काळजी घेता येईल.. वगैरे. यात महत्त्वाचा मुद्दा अभ्यासाचा. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा. असा मूलगामी अभ्यासूपणा आणि त्यामागचा सर्वंकष दृष्टिकोन- होलिस्टिक अॅप्रोच- कोणत्याही जबाबदार व्यवस्थेत फक्त मोठय़ा संकटांपुरता बाळगला जात नाही, तर सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रत्येक गोष्टीत याच दृष्टीने विचार आणि कृती केली जाते. सामान्य माणसाचे रोजचे जगणे सुकर करणाऱ्या तिथल्या व्यवस्था अत्यंत सुस्थितीत असणे जरा जास्तच अधोरेखित होते, ते आपल्याकडे प्रत्येकच पातळीवर असलेल्या अव्यवस्थेमुळे. या नेहमीच्या चर्चेला पाश्चिमात्य देशांमधली नेमस्त लोकसंख्या आणि आपला लोकसंख्येचा विस्फोट या नेहमीच्याच मुद्दय़ाने उत्तर दिलेही जाते. पण ते उत्तर नसते, ती असते शिताफीने दिलेली बगल. याच मनोवृत्तीची फळे तमाम भारतीयांना अगदी पावलोपावली भोगावी लागतात.
कोविडसारख्या मोठय़ा संकटाच्या काळात आपण उपचार केंद्रे वाढवतो, लशीच्या प्रसारासाठी युक्त्या योजतो.. पण संकटाची तीव्रता कमी होताच आपल्या गाफीलपणाचे पहिले पाढे पंचावन्न. याचे ताजे उदाहरण सध्या देशाच्या शहरी, निमशहरी भागात दिसते आहे.. खोकल्याच्या आवाजांतून ऐकूही येते आहे. कोठेही जा, दिसतात ते ओसंडून वाहणारे दवाखाने आणि खोकून खोकून बेजार झालेली माणसे. महिना दोन महिने टिकणाऱ्या खोकल्याने सर्व थरांतील माणसांना जेरीला आणले आहे. त्याशिवाय अनेक शहरांमध्ये तापाचे रुग्ण आहेतच. ‘एनफ्ल्यूएन्झा वन’ या विषाणूचा हा ‘एचथ्रीएनटू’ हा उपप्रकार असून गेल्या दोन ते तीन महिन्यांत त्याचा देशभर वेगाने प्रसार झाला आहे, असे अन्य देशांतील संस्थांप्रमाणे आपल्या इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचेही म्हणणे आहे. फ्लूचा हा विषाणू मोठा ताप, सर्दी, खोकला या आजारांचे एक कारण ठरतो आहेत. यापैकी किमान खोकल्याचे रुग्ण देशभर वेगाने वाढले असून सध्याचे सतत बदलते हवामान, प्रदूषण या घटकांमुळे त्याचा वेगाने प्रसार होतो आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
व्यक्तिगत पातळीवर या प्रश्नाकडे बघितले तर सर्दी, ताप, खोकला आहे का, मग काढे घ्या, औषधे घ्या, व्हाल बरे असा साहजिक दृष्टिकोन असतो. लवकर त्यातून बरे न होणाऱ्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, असाही अगदी स्वाभाविक निष्कर्ष काढला जातो. असे रुग्णही मग हे डॉक्टर, ते डॉक्टर, या चाचण्या, त्या चाचण्या, ही औषधे, ती औषधे असे करत फिरत राहतात. आपल्याच वाटय़ाला हे महिनोन्महिने बरे न होणारे आजारपण का आले आहे, असे कुढत राहतात. पण एखादा आजार, भले तो खोकल्यासारखा वरवर साधा दिसणारा असेल, तो सगळय़ाच स्तरांत मोठय़ा प्रमाणात दिसत असताना त्याची बोळवण अशा वैयक्तिक कारणांनी कशी काय करता येईल?
खरे तर सर्दी-पडसे, ताप, खोकला हे ऋतुमान बदलते तेव्हा हमखास होणारे आणि थोडय़ाशा औषधोपचारांनी बरे होणारे आजार. पण गेली काही वर्षे हे साधे साधे आजारही सहजपणे बरे होताना दिसत नाहीत. त्यासाठी हवामान बदलाकडे बोट दाखवले जाते, ते बरोबरच आहे. ऋतू बदलण्याच्या संधिकाळात दिवस आणि रात्र या दोन्हींच्या तापमानात जवळपास दहा अंशांचा फरक असणे, परिणामी आजारांमध्ये वाढ होणे आणि ते लवकर बरे न होणे हे दृश्य परिणाम दिसत आहेत. या बिघडलेल्या निसर्गचक्राला जोड मिळते आहे ती प्रदूषण या मानवनिर्मित घटकाची. वाहनांचा धूर, सर्व शहरांत सगळीकडे सुरू असलेली विविध प्रकारची बांधकामे, त्यातून पसरणारी धूळ यांसह प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे इतरही अनेक घटक आहेत. शिवाय जागतिक तापमानवाढीचे मूळ या प्रदूषणात आहेच. हे सगळे आज घडते आहे, असे अजिबातच नाही. त्याचे परिणाम काय असतील हेदेखील अभ्यासक गेली काही वर्षे सांगत आले आहेत. म्हणजेच हवामान बदल, तापमानवाढ, प्रदूषण आणि त्या सगळय़ाचा आरोग्यावरचा परिणाम हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हा मुद्दा ‘कोविड १९’च्या महासाथीसारखा अचानक येऊन आदळलेला नाही. मग त्यांच्याबाबतीत आपण काय केले? काय करतो आहोत?
गेली काही वर्षे तापमानवाढ आणि प्रदूषणांमुळे वाढत असलेल्या या साध्या साध्या आजारांचा आपल्याकडे काही अभ्यास झाला आहे का? त्याची काही आकडेवारी उपलब्ध आहे का? या किरकोळ वाटणाऱ्या पण सार्वत्रिक आजारांबाबत आरोग्य यंत्रणा किती सजग आहे? सर्वंकष दृष्टिकोन ठेवून आपण आरोग्याचे प्रश्न हाताळू शकतो, हे कोविडकाळात दिसले. पण आरोग्याच्या दैनंदिन प्रश्नांमध्येही तो असायला हवा की नको? सध्याच्या लवकर बरा न होणाऱ्या खोकला, तापासारख्या आजारांमध्ये आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेऊन खासगी आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करायला हवे. तूर्तास तसे होताना अजिबातच दिसत नाही. कारण त्यासाठीचा अभ्यास, संशोधन, आकडेवारी हे काहीच आपल्याकडे उपलब्ध नाही.
बरे, या सगळय़ाची अपेक्षा आरोग्य यंत्रणेकडून तरी कशी करणार? मुळात या क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतूद वर्षांगणिक आटत चालली आहे. अंगणवाडी सेविका, एएनएम यांच्यासारख्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असणाऱ्या, या व्यवस्थेच्या माहितीचा स्रोत असणाऱ्यांना तुटपुंज्या ‘मानधना’वर काम करत, वेतनवाढीसाठी सतत आंदोलन करावे लागते, निवासी डॉक्टरांना आपल्या मागण्यांसाठी दर काही काळाने संप करावा लागतो, अशी आपल्याकडची परिस्थिती. तिथे लोक खोकून बेजार होतात म्हणून कोण लक्ष देणार? राज्यकर्ते आणि कदाचित धोरणकर्त्यांनाही मोठय़ा संकटातच चांगले काम करून दाखवण्यावर समाधान मानायचे असेल, तर महिना-दोन महिने बरा न होणारा खोकला हा सामान्यजनांना मात्र अनारोग्याकडे ढकलणारा ठरेल.
दिनांक ५ एप्रिल २०२३
माझा महाराष्ट्र