पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले परीक्षार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन

0
 
‘स्वेरी’च्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘परीक्षा पे चर्चा २०२५’ लाईव्ह उपक्रमाचा फायदा
           पंढरपूर (प्रतिनिधी) – भारताचे उपक्रमशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन केले. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांतील सर्व वर्गात या लाईव्ह उपक्रमाची व्यवस्था केली होती. याचा इंजिनिअरिंग व फार्मसी मधील पदविकेपासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
       केंद्रीय मंत्रालयाच्या ‘मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन’ यांच्या आदेशाने व ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांच्या सूचनेनुसार तसेच स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने डिप्लोमा इंजिनिअरिंग, डिग्री इंजिनिअरिंग, डिप्लोमा फार्मसी व डिग्री फार्मसी मधील विद्यार्थ्यांना ‘परीक्षा पे चर्चा २०२५’ या लाईव्ह उपक्रमाचा आनंद घेता आला. सध्या परीक्षेचे दिवस असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेला कसे सामोरे जावे, आपला हेतू काय असावा, परीक्षा देताना आपली मानसिकता कशी असावी? याबाबत सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत एक तास मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांना व भविष्यात परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या बहुमोल मार्गदर्शनाचा फायदा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी ओघवत्या शैलीत अभ्यासपूर्ण भाषण केले. यामुळे परीक्षार्थ्यांचे मनोबल वाढले असून ते आत्मविश्वास पूर्वक परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तासभर केलेल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता भविष्याचा विचार करून शांतपणे वर्तमानकाळात अभ्यास करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या प्रवाही भाषणानंतर विद्यार्थी अधिक उत्साही झाल्याचे जाणवले.
           डिग्री फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ डिप्लोमा फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे आणि डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंग (पदवी व पदविका) व  फार्मसी (पदवी व पदविका) महाविद्यालयात या ‘परीक्षा पे चर्चा’ प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्येक वर्गात, तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हॉलमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती. या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती यांच्यासह सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व वर्गशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)