तीर्थक्षेत्र पंढरीतील बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य.....

0
बस स्थानक परिसरातील घाणीचे साम्राज्य पाहून आमदार समाधान आवताडे संतापले

अधिकाऱ्यांना घेतले फैलावर 

        पंढरपूर (प्रतिनिधी) दि. १३ ऑगस्ट - महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. शेतकऱ्यांचा देव अशी ओळख असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणारा भाविक बहुतांश एसटी बसने प्रवास करतो. आपल्या गावावरून पंढरपूरला उतरल्यानंतर त्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात आणि बस स्थानक परिसरात स्वच्छता असावी ही माफक अपेक्षा या भाविक प्रवाशांचे असते. 
             मात्र पंढरपूर बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छ पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नाही. बस स्थानक परिसरात जागोजागी घाण व कचरा साठलेला आहे. याबाबत अनेक माध्यमातून बातम्या प्रसारित झाल्या आहेत. तसेच जागरूक नागरिक आणि प्रवाशांनी वारंवार बस स्थानक प्रशासनाकडे तक्रारी करून देखील दुर्लक्ष केले जात होते. 
       या सर्व बाबी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अचानक पंढरपूर बस स्थानकाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यामध्ये बस स्थानकातील शौचालय, पिण्याचे पाणी, फलाट, तसेच बस स्थानकाच्या बाहेर आणि आतील बाजूस असलेले व्यापारी गाळे, या ठिकाणी जागोजागी कचरा व घाण साठलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आमदार समाधान आवताडे चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी महामंडळ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुख गैरहजर होते. त्यांना आमदार समाधान आवताडे यांनी फोन करून स्वच्छता कंत्राटदार कोण आहे. आणि तो योग्य पद्धतीने त्याचे काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवाल केला. त्याचबरोबर बस स्थानक परिसरातील जागोजागी पडलेला कचरा एका आठवड्यात पूर्णपणे स्वच्छ करून घ्या मी पुढच्या आठवड्यात पुन्हा येईन आणि स्वच्छता झाली असल्याची खात्री करेन असे सांगितले.
         यावेळी त्यांच्यासोबत प्रांत अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर शहर चे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर, परिवहन महामंडळाचे वाहतूक निरीक्षक दळवे, यांच्यासह इतर अधिकारी व आमदार समाधान आवताडे यांचे कार्यकर्ते प्रवासी व बस स्थानक परिसरातील व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)