फलटण मध्ये अनेक दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश

0

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण येथे  कार्यकर्त्यांची बैठक
           सातारा (प्रतिनिधी) — फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाअंतर्गत राजे गटामध्ये मोठे खिंडार पाडण्यात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना यश आले असून अनेक दिग्गजांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

         माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली असून महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले होते. त्यामुळे त्यांना प्रचाराला मोठा वेळ मिळाला असून अनेक गावातील दिग्गजांची भाजपमध्ये वर्णी लावण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रयत्न करीत आहेत.फलटण तालुक्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात सर्व सत्तास्थाने असून सध्या आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत.आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवाराला विरोध केला आहे. मात्र आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व अकलुजचे मोहिते पाटील यांच्या विरोधाला न जुमानता भाजपने खासदार रणजितसिंह यांच्यावर विश्वास ठेवल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एकामागे एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
          आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटातील दिग्गज समजले जाणारे अनेक म्होरके फोडण्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना हे यश आले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे, संजय सोडमिसे, सागर कांबळे, माजी नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहीवळे, ॲड संदीप लोंढे ,शरद रणदिवे, धनंजय मोरे, रणजीतसिंह भोसले, डॉ सूर्यकांत दोशी, सचिन भालेराव यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. या दिग्गजांच्या पक्षप्रवेशाची दिवसभर संपूर्ण फलटण तालुक्यात चर्चा सुरू होती.
            दरम्यान राजे गटातील आणखी काही दिग्गज लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)