सिकंदरने पटकावला भीमा केसरीचा किताब; कुस्ती शौकिनांनी अनुभवला चिमुकल्या अमरेंद्रचा रुबाब
खा. महाडिक यांचा खांद्यावर घेत केला सन्मान, सिकंदरने भीमा केसरीसह जिंकली सर्वांची मने
सिकंदर शेख ठरला डबल भीमा केसरी; विश्वराज महाडिक यांनी घडवलं साडेतीन शक्तीपीठ दर्शन
भीमा केसरी : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान सिकंदरने गाजवलं; महिला पैलवानांच्या कुस्त्यांनी कुस्ती शौकीन भारावले
मोहोळ (प्रतिनिधी) - १५ हजार पेक्षा जास्त कुस्ती शौकिनांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झालेल्या लढतीत यावर्षीचा भीमा केसरी होण्याचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला आहे. पंजाब केसरी प्रदीपसिंग जिरगपूरला चितपट करत सिकंदर शेखने डबल भीमा केसरी किताब घेण्याची किमया केली आहे. संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला. कुस्ती क्षेत्रासाठीच योगदान विचारात घेऊन खा. धनंजय महाडिक यांचा सन्मान करत सिकंदरने खा. महाडिक यांना खांद्यावर घेत मैदानाची फेरी मारली. या स्पर्धेचं आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी कारखाना कार्यस्थळावर केलं होतं.
भीमा केसरीच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दोनही पैलवान हे तुल्यबळ होते. पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर विरुद्ध महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशी अपेक्षेप्रमाणे कडवी झुंज झाली. १५ व्या मिनिटाला वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे प्रदीपसिंगचा निभाव लागला नाही. प्रदीपसिंगला चितपट करून सलग दुसऱ्यांदा भीमा केसरी होण्याचा बहुमान सिकंदर शेखने पटकावला. भीमा केसरीसह इतर प्रमुख किताबांचे विजेते भीमा सभासद केसरी - माऊली कोकाटे, भीमा कामगार केसरी - पृथ्वीराज पाटील, भीमा साखर केसरी - महेंद्र गायकवाड असे ठरले. तत्पूर्वी प्रमुख कुस्त्यांच्या अगोदर नवोदित पैलवानांच्या नेत्रदीपक अशा एकूण ४३२ निकाली कुस्त्या पार पडल्या. यावर्षी नवोदित पैलवानांच्या कुस्त्यांमध्ये स्थानिक मल्लांचा सहभाग वाढण्यात गतवर्षीची भीमा केसरी मोलाची ठरली.
संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवसानिमित्त नागरी सत्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा देताना आमदार यशवंत माने यांनी आजच्या कुस्ती आखाड्यात एकाच वेळी महाडिकांच्या तीन पिढ्या असल्याचा दाखला देत खासदार महाडिक यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. तर विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पुढील भीमा केसरीच्या आखाड्यात खासदार महाडिक यांनी केंद्रीय मंत्री म्हणून उपस्थती लावावी यासाठी श्री विठ्ठल चरणी साकडं घातलं. या नागरी सत्कारावेळी आमदार यशवंत माने, मनोहर डोंगरे, धैर्यशील मोहिते पाटील, अभिजित पाटील, शिवाजीराव काळुंगे, उमेश पाटील, सुजित कदम, समाधान काळे, बी. पी. रोंगे, मानाजी माने, श्रीकांत देशमुख, विराज अवताडे, चरणराज चवरे, पृथ्वीराज माने, दीपक माळी, शिवाजी पवार, सतीश जगताप तानाजी गुंड, शिवाजी गुंड सुशील क्षिरसागर, काकासाहेब पवार, अस्लम काझी यांच्यासह भीमा कारखाना आजी-माजी संचालक, भीमा परिवारातील कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने कुस्ती शौकीन जनसमुदाय उपस्थित होता.
आगळा वेगळा आदर्श -भीमा केसरीच्या आखाड्यात प्रथमच महिला पैलवानांच्या कुस्त्या
गतवर्षी पश्चिम महाराष्ट्रात गाजलेलं कुस्ती मैदान ठरलेल्या भीमा केसरी आखाड्यात यंदा अचानक महिला पैलवानांच्या कुस्त्यांची घोषणा करण्यात आली. आणि पूर्ण कुस्ती सूट घालून महिला पैलवान मुली लाल मैदानाच्या आखाड्यात उतरल्या, यावेळी उपस्थित कुस्ती शौकिनांनी भरभरून दाद देत टाळ्यांच्या गजरात मैदान दणाणून सोडले. खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक व स्नूषा वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते महिला कुस्त्यांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विजेत्या महिला पैलवानास आलिंगन देत मंगलताई महाडिक यांनी पुढील यशस्वी वाटचालीस शुभाशिर्वाद दिले.
चिमुकल्या अमरेंद्रची पडली सर्वांनाच भुरळ; एकाच वेळी एकाच आखाड्यात महाडिक यांच्या तीन पिढ्या
भीमाचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी आपला पुतण्या अमरेंद्र पृथ्वीराज महाडिक याला कडेवर घेत आखाड्यात एंट्री घेतली. हलगीच्या आणि डी जे च्या आवाजावर ठेका धरत चिमुकल्या अमरेंद्रने सर्वच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. खासदार महाडिक यांच्या जंगी स्वागत एंट्रीने तर वातावरण गजबजून निघालं. यावेळी खासदार महाडिक यांच्या कडेवर असणाऱ्या अमरेंद्रने चक्क आपले आजोबांची हात उंचावून अभिवादन करण्याची लकब आजमावत उपस्थितांना अभिवादन केलं. एकाच वेळी भीमा केसरीच्या आखाड्यात उपस्थित असणाऱ्या महाडिक यांच्या तीन पिढ्या हे कुस्तीसाठी एक आगळंवेगळं योगदानच आहे.
जे मला जमलं नाही ते विशुभैय्यांनी करून दाखवलं - खा. महाडिक
"२०११ साली भीमा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झालो त्यावेळी कुस्ती स्पर्धा घ्यावी अशी माझी ईच्छा मी बोलून दाखवली होती. मात्र मला ते साध्य झालं नाही याची खंत माझ्या मनात होती. मात्र सलग दोन वर्षी विश्वराज महाडिक यांच्याकडून भीमा केसरीचे करण्यात आलेलं आयोजन हे पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक करणारं आहे" अशा भावना खा. महाडिक यांनी सत्काराला उत्तरादाखल केलेल्या भाषणात व्यक्त केल्या.