देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर दीपक रणनवरेंचे उपोषण मागे

0
येत्या 13 तारखेला नागपूर अधिवेशनात होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची बैठक

          जालना (प्रतिनिधी) :  ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने श्रीपरशुराम आर्थिक विकास महामंडळ व इतर मागण्यांसाठी श्री. दीपक रणनवरे जालना येथे गेले आठ दिवस उपोषणास बसलेले होते. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार रणनवरे यांनी व्यक्त केला होता. राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्ह्यातील विविध आमदार यांनी रणनवरेची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठोस आश्वासन आल्याशिवाय उपोषण वापस घेणार नाही असा पवित्रा रणनवरे यांनी घेतला होता.
          या पार्श्वभूमीवर काल दिनांक 4 डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दीपक रणनवरे यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला व संबंधित विभागाचे मंत्री श्री. अतुल सावे यांच्या सहीचे पत्र आज  जिल्हाधिकारी जालना व पोलीस अधीक्षक जालना यांनी प्रत्यक्ष आणून दिल्यानंतर त्यांच्याच हस्ते ज्यूस घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले.
           शासनाने रणनवरे यांना दिलेल्या पत्रात दिनांक 13 डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची बैठक लावल्याचे कळवले आहे.

          आंदोलनाचे मुख्य समन्वयक व उपोषणकर्ते श्री. दीपक रणनवरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी शासनाच्या भूमिकेचे स्वागत केले परंतु मागण्यांवर लवकर तोडगा न निघाल्यास अजून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील सरकारला दिला. त्यासोबतच गेले आठ दिवस या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व समाजघटक तसेच इतर समाजाचे नेते संघटना यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी राज्यसमन्वयक दिपक रणनवरे, सौ विजया कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी, ईश्वर दीक्षित, विश्वजीत देशपांडे,  सुरेश कुलकर्णी, बलवंत नाईक, मकरंद कुलकर्णी, संजय देशपांडे, राजेंद्र पोतदार,  यांच्यासह मोठया प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)