जुनी पेन्शन योजना बाबत
नागपूर (प्रतिनिधी) - राज्यातील 26500 नोकरदारांना जुन्या म्हणजेच 1982 च्या निवृत्ती वेतनाप्रमाणे लाभ देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात केली. याबाबत लवकरच अधिसूचना निघणार आहे तथापि त्यामध्ये राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आहे व त्याचा उल्लेख आदेशात करावा तसेच जाहिरात प्रसिद्धी दिनांक 31 मे 2005 ऐवजी 31 ऑक्टोबर 2005 असा उल्लेख करावा अशी विनंती पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी एकनाथ शिंदे यांचेकडे नागपूर येथे भेट घेऊन केली. त्यावर लगेच टिपणी करून तशा सूचना संबंधित पत्रावरती नोंदवून प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यावर उचित कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी संबधीत प्रशासकीय अधिकारी यांना दिले. सदर पेन्शन साठी सावंत यांनी अनेक मोर्चे, आंदोलने शांततेत केली होती.
यावेळी अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, रायगड विभागाचे माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे आदी उपस्थित होते. या बदलानंतर नव्याने होणाऱ्या आदेशाने शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांचा संभ्रम दूर होणार आहे. लोककल्याणकारी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत राज्यभरातील सर्व कर्मचाऱ्यातून होत आहे याबाबत सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आमदार सावंत यांचे अभिनंदन केले आहे.