वारंवार होत असलेल्या अन्यायाविरुध्द पंढरपूरातील आदिवासी कोळी महादेव समाजाचा शासनाला इशारा !

0


          पंढरपुर (प्रतिनिधी) : वारंवार होत असलेल्या समाजाच्या छळवणूक, पिळवणूक व अन्यायाविरुध्द पंढरपुरातील आदिवासी कोळी महादेव समाज आक्रमक झाला असून जातीच्या दाखल्यासह समाजाचे प्रलंबित प्रश्‍न लवकरात लवकर नाही सोडले तर ठिकठिकाणी प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाच्या विरूध्द रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलनं, आमरण उपोषण, मोर्चा असे आंदोलनं करण्यात येतील असा इशारा आदिवासी कोळी महादेव समाजााने दिलाय. याबाबतचे निवेदन नुकतेच प्रांताधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर शहर पोलीस ठाणे व तहसिलदार, पंढरपूर यांना देण्यात आले आहे.
         महाराष्ट्रात आदिवासी महादेव कोळी समाज हा टीएसपी, ओटीएसपी अशा दोन विभागात विखुरला गेला आहे. म्हणजे या विभागात राहत आहे. सद्यस्थितीत टीएसपी विभागात आमचेच समाज बांधव राहत आहेत. त्यांना सोयी, सुविधा, सवलती, दाखले, वैधता सहज सुलभतेने मिळतात आणि आम्ही ओटीएसपी क्षेत्रात राहत असून आमचे ऐतिहासिक पुरावे, कागदोपत्री पुरावे, असुनसुध्दा आम्हाला अनुसुचित जमातीचे दाखले देण्यात प्रशासकीय अधिकारी एकदम तुच्छतेची वागणूक देऊन कोणत्याही कायद्याचा सबंध नसताना कायद्याची भीती घालून आमची प्रकरणे फेटाळतात व कोर्टात जाण्याचा सल्ला देतात. 2003 च्या कायद्यात स्पष्ट केल्याप्रमाणे म्हणजे 1950 च्या पुर्वीचा जर एखाद्या उमेदवाराकडे जातीचा नोंदणीचा पुरावा मिळून आला नाही तर तो उमेदवार 1950 चे पुर्वी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा महसुली पुरावा सादर केला तरीसुध्दा त्या उमेदवारास अनुसुचित जमातीचा दाखला देण्यात यावा असे नमूद असताना महसुली अधिकारी प्रकरणे जाणूनबुजून नाकारतात. आम्हास म्हणजे आदिवासी महादेव कोळी समाज अनुसुचित जमातीचे जातीचे दाखले देण्यास उपविभागीय अधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिखारी हे आमचा समाज म्हणजे आदिवासी महादेव कोळी यांना नेस्तनाबूत करण्यासाठी बसलेले आम्हास जाणवू लागलेले आहे. सुशिक्षीत तरुण तसेच छोटे शेतकरी वर्ग अति अन्यायग्रस्त होऊन प्रशासनाच्या विरोधात व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको, जेलभरो, आमरण उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चा करण्यासाठी एकत्र येत आहोत.
 
         तरी लवकरात लवकर वरील प्रश्‍नासोबतच आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेतील स्मारकाचा प्रश्‍नही लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा आम्ही सर्व समाजबांधव दिनांक 23 -11-2023 रोजी सकाळी 11 वाजता विविध ठिकाणी रास्ता रोको, जेलभरो आंदोलन, आमरण उपोषण व धरणे आंदोलनासह विविध प्रकारची आंदोलनं करणार आहोत असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय.

        येणार्‍या कार्तिकी एकादशी निमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अथवा इतर कोणत्याही मंत्र्याना पंढरपुरात फिरकु देणार नाही, किंवा त्यांना प्रवेशबंधी करु, काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करु, यावेळी आमच्यावर अश्रुधुर, लाठीहल्ला, गोळीबाराच्या फैरी झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलाय. यावेळी गणेश अंकुशराव, दादा करकमकर, संदीप माने, विक्रम शिरसट, सिध्दनाथ कोरे, पांडुरंग सावतराव, विजय अभंगराव, सुनील अधटराव, गणेश कांबळे, माऊली कोळी, संपत सर्जे, आकाश माने, आकाश पांढरे, संजय माने, प्रकाश मगर, विकी अभंगराव, अमित साळुंखे, किशोर सुरवसे, महेश माने, चेतन नेहतराव, सुरज ननवरे, अक्षय कोळी, रघुनाथ अधटराव, होनकुंबरे, सुशील नेहतराव, मयुर अभंगराव, सचिन नाईकवाडी व आदिवासी महादेव कोळी समाजाचे अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)