पंढरपूरातील खड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर !

0

महर्षी वाल्मिकी संघाने चक्क रस्त्यावरील खड्ड्यांना घातला फेट्यांचा आहेर !!

         पंढरपुर (प्रतिनिधी) : सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील नेत्यांची पक्षनिष्ठा आणि राजकारणातील तत्व जशी घडीगणीक काळानुरुप बदलताना दिसत आहेत, तसे या राज्यातील विविध प्रश्‍नंही रेंगाळत पडलेले आढळून येत आहेत. महाराष्ट्राची अध्यात्मीक नगरी म्हणून ओळख असलेल्या भुवैकुंठ पंढरी नगरीमधील विविध प्रश्‍नही जैसे थे! प्रलंबित आहेत. शहरातील अस्वच्छता, नादुरुस्त बगिचे यासोबतच शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, आवश्यक तेथे गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग या प्रश्‍नांकडे सार्वजनिक बांधकाम खात्यासह नगरपालिका प्रशासनाकडून जाणुनबुजून दुर्लक्ष होत आहे. याबाबत आज पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी येथील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात पडलेल्या खड्ड्यांना फेटयांचा आहेर घालून आपला संताप व्यक्त केला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पंढरपुरातील खड्ड्े बुजवलेच पाहिजेत च्या घोषणांनी परिसर दणानुन सोडलेला आढळून आला.

          पंढरपूर नगरपरिषद प्रशासन, राजकीय नेते यांच्याकडून वरील प्रश्‍नांकडं दुर्लक्ष होत असल्याने वर्षानुवर्षे हे प्रश्‍न रेंगाळलेले आहेत. विविध मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले असून नागरिकांना यामुळे श्‍वसनाचे आणि मणक्यांचे विकार जडत आहेत, विशेषत: लहान मुलांचे व वयोवृध्दांचे आरोग्य अतिशय धोक्यात आले आहे. खड्ड्यांमुळ अनेक ठिकाणी अपघातही होत आहेत. आज आम्ही रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना फेटा घालून या प्रश्‍नाकडे राजकीय नेते व प्रशासकीय अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. आत्तातरी हे प्रश्‍न तातडीने सोडवण्यात यावेत अन्यथा आम्ही याविरुध्दचे पुढचे आंदोलन अधिक तीव्र स्वरुपाचे व आगळे वेगळ्या स्वरुपाचे करु. असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला.
 
          यावेळी निलेश माने, रामभाऊ कोळी, माऊली कोळी, गणेश कांबळे, अप्पा करकमकर, बिभीषण माने, शंभू अभंगराव, मोहसीन बागवान, प्रदीप परचंडे, मल्लीकार्जुन अभंगराव, प्रशांत कांबळे, आण्णा अधटराव, प्रथमेश शिंदे, भाऊ कोळी, उमेश जाधव, आण्णा अंकुशराव, रवि नाईकवाडी, पवन अधटराव, अंबादास नाईकवाडी यांचेसह महर्षी वाल्मिकी संघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)