दर तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास,मल मास, किंवा पुरुषोत्तम मास यंदा अधिक फल देऊन गेला. आता दर तीन वर्षातून एकदा का येतो त्याला अधिक मास का म्हणतात हे सर्व खगोलशास्त्र भूगोलाच्या माध्यमातून सर्वांना माहितच आहे. ते मी आता सर्व सांगत बसत नाही. यावर्षीच्या अधिक महिन्याने मात्र अधिक फल अनेकांना दिले आहे.
जसा अधिक मास चालू झाला तेव्हा पासूनच तोबा गर्दी सर्वच तिर्थक्षेत्रांनी खेचलेली पहावयास मिळाली. आमच्या पंढरपूर क्षेत्री तर दररोज दोन ते तीन लाख भक्त येत होते. आषाढी वारीत सुध्दा जेवढी गर्दी झाली होती तिच्या अधिक पटीने गर्दी महिनाभर वहात राहिली.ऐवढी गर्दी की वाटत होतं लोकांना देवाने झपाटले आहे.त्यात एस्.टी.ने महिलांना दिलेल्या पन्नास टक्के सवलतीच्या मुळे महिलांची गर्दी तुलनेने अधिक होती.पन्नास टक्के खर्च बसचा वाचल्यामुळे आलेल्या भोळ्या बायांनी पंढरपूरी खरेदीसाठी हात ढिला सोडला. त्यामुळे व्यापारी खूष आहेत.
अधिकस्य अधिक भक्त भेटल्याचा आनंद देवाला ही अधिक देऊन गेला.देवाचा मुखमंडलावरची प्रसन्नता ओसंडत होती. त्यामुळे देवाने ही सर्वांना अधिकचा आशीर्वाद दिला असणार.दर्शन रांगेतून घेतलेल्या भक्ताचा आनंद तर दिसत होताच.पण वशिल्याने दर्शन घेतलेल्या व्हीआयपी चे ही चेहरे आनंदले होते. नेहमी दोनचारशे रुपयात दर्शन घडविणार्यांना ही अधिकस्य अधिक फलं प्राप्त झाले. दोन हजार रेट अधिक दर्शनाला होता. अधिकारी, आमदार वगैरे व्हीआयपी यांनी ही दर्शन घेऊन समाधान पावले.गर्दी असूनही थेट मंदिरापर्यंत गाड्या बिनदिक्कतपणे घेऊन जाण्यातही मोठेपणा असतो तो दिसून येत होता.*एक सुंदर वाक्य सोशल मीडियावर पहायला मिळाले "रांगेतून दर्शनाला जा.वशिल्याने तुम्ही मूर्ती पर्यंत पोहचू शकता पण देवापर्यंत नाही ".* अर्थात
ईश्वरत्व समजण्यावर आहे.त्यामुळे दर्शनाला सोडणार्या लोकांना ही अधिक फल देऊन हा मास गेला.
अनेक व्यापाऱ्यांना वारी पेक्षा अधिक महिना चांगला समाधानकारक झाला असे ऐकू येत आहे. आषाढी वारी पेक्षा अधिक महिन्यात महिनाभर व्यापार धंदा झाल्याचे बोलले जाते. काही व्यापारी म्हणाले दोन वर्ष कोरोना काळात बसून खाल्लं,धंदा पाणी काहीच नव्हते.दोन वर्षात शिल्लक पैसे गेले. ते या वारी व अधिक महिन्यात भरुन निघाले. अगदी चहा पासून जेवणा पर्यंत, कुंकू बुक्क्या पासून सराफांपर्यंत सर्वांना व्यापार चांगला झाला. हे अधिकस्य अधिक फलम् म्हणावे लागेल. तीन वर्षातून एकदा हा मास येतो. त्यामुळे या महिन्यात जावायाचा मान अधिक असतो.
अनेक सासुबाईंनी आपल्या लेक जावयांना घरी बोलावून सुग्रास मिष्ठांन्न भोजनाची मेजवानी दिली. विशेषतः पुरणाचे धोंडे खाऊन जावाई खूष झाले. वाणात मुलीला एखादा ऐपती प्रमाणे दागिना, निदान जोडवी , जावयास आहेर यामुळे अर्थचक्र जोरात फिरले.अनेक जावई खूष झाले. आणि पुढच्या अधिकाची वाट पाहू लागले. ( मी ही कुणाचा तरी जावई आहेच हं. )
पंढरपूरच्या स्थानिक लोकांना गर्दी सहन करण्याची सवय आहे. पण महिनाभर गावात गर्दी झाल्याने त्रासदायक वाटले.मात्र टांगेवाले रिक्षाचालक यांनी भरपूर कमाई करताना ते किती प्रवासी बसवत आहेत ह्याचा विचार कुणी केलाच नाही. चालकांना गणवेष नाही, मिटर नाही, कुणी विचारत नाहीत, अठरा वर्षाखालील मुले सुध्दा रिक्षा चालवित होते. बाहेर गावाहून आलेल्या खाजगी वाहनांच्या तर रांगाच रांगा होत्या. आमदार खासदारांनी आपल्या मतदारसंघातील भाविकांची चांगल्या वाहनांची मोठ्या संख्येने सोय केल्याने मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. त्यांना ही अधिक पुण्ण्य हा महिना देऊन गेला.इतके भाविकांची सोय करुन करुन लोक ही कंटाळल्याचे दिसत होते.
पंढरीरायाचा भक्त म्हटल्यावर हा भोळा असतोच. अनेक महिलांनी पुरणाचे धोंडे घरुन येतानाच करुन आणले होते. श्रध्देने या महिला गाईंना, देवाला मंदिरात देत होत्या. गाईगुरे सुध्दा नंतर ते खाईनात इतके धोंडे तिर्थक्षेत्री आले.ते अनेक छोट्या मोठ्या मंदिरात, रस्त्यावर, झाडांखाली,पहायला मिळाले.एकतर पत्रावळी भरून धोंडे मंदिराच्या शेजारी असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंती वरती पहायला मिळाले."अन्न हे पूर्णब्रह्म"असं कुठेही पडलेलं पाहून मन सुन्न झालं.अधिक महिन्यात तिसतीन चे महत्त्व असल्याने अनेक मठ, वाड्यातून,घरातून मिष्ठांन्न जेवणाळी झाल्या.काही ठिकाणी दररोज सवाष्ण भोजन असल्याने महिला वर्ग ही आनंदी होता.( कारण घरच्या कामातून सुटका झाल्याने )शिवाय चांगले वस्त्रालंकार काही ठिकाणी देऊन जेवण दिले जात होते. खूप पुण्ण्य लोकांना मिळाले. आत्म्याचे मुक आशीर्वाद लाभले.
खर तर जगद्गुरु तुकोबांनी म्हटलय....ठायीची बैसोनी करा एक चित्त।आवडी अनंत आळवावा।। किंवा
न लगते सायास।जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण ।। ह्या वचनांचा विसर का पडावा. का गर्दी करावी?का वशिल्याने दर्शन घ्यावे?का अन्नाची नासाडी करावी?पत्रं पुष्पं फलं तोयं। अस स्वतः म्हणणार्या देवाच्या दानपेट्या का ओसंडून वाहतात?या दानपेटीतील दानाचा उपयोग भक्तासाठी किती?येवढ्या लांबून लांबून भक्त येतात आपले नवस बोल फेडतात. ते खोटे दागिने कसे अर्पण करतील?जर खोटे दागिने द्यायचेच असतील परिस्थिती मुळे तर तो बोलेलच कशाला?असे अनेक प्रश्न समोर उभे रहातात. प्रल्हादाला देव भेटला.सावतामाळी यांना भेटला तेही त्याच्या रानात, तुकोबांच्या वह्या रक्षिल्या,नामदेवांना भेटला, कारण त्यांनी आत्मा जाणला.खरा देव जाणला. तसा आपण ही योग्य संतमार्गाने जाऊन देव प्राप्त करावा.अधिक मासा सारख्या महिन्यात भोळे भाभडेपणाने, कर्मकांडातून काय साध्य होईल?काही करण्यापेक्षा डोळस पणे भक्ती करावी.कारण अध्यात्म हे आत्म्याशी निगडित शास्त्र आहे. असे मला वाटते. तसे करून अधिकस्य अधिक फल प्राप्त करुन घ्यावे.
श्रीकृष्णार्पण !