।। श्री शंकर ।।
।। श्रीअस्मदगुरूभ्यो :।।
।। न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' ।।
श्रीमद्भगीता अध्याय ४था श्लोक ३८
वरील श्रीमद्भगीतेतील हा श्लोक ज्या महान व्यक्तीच्या वर्णनासाठी वापरला ते व्यक्तीमत्व म्हणजे ज्ञानेश्वरीचे उपासक, संशोधक ,थोर भगवद्भभक्त तत्वज्ञ संत साहित्याचे अभ्यासक, संपादक आदरणीय वंदनीय श्री. सोनुमामा दांडेकर यांची आज तिथिनुसार पुण्यतिथी आषाढ शु.चर्तुदशी आदरणीय मामांबद्दल थोर तत्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण काय म्हणाले ते पाहा " ‘I see nothing less in Prof. Dandekar a true follower of my friend Prof. R.D. Ranade – a great philosopher of today. हे उद्गार स. पा. महाविद्यालयात तत्वज्ञान महामंडाळाच्या स्थापनेच्या समारंभातील आहे. हे मंडळ सोनुमामा यांनी स्थापन केले होते. श्री. मामा जोग महाराजांच्या संपर्कात आल्यामुळे हरिभक्ती व देशभक्तीबरोबरच ज्ञानेश्वरीची गोडी लहान वयात त्यांना लागली.
त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतली (१९१७). त्या काळी रॅंग्लर र. पु. परांजपे, गुरुदेव रा. द. रानडे अशा अनेक नामवंत व्यक्ती तेथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांपैकी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गुरुदेव रानडे व जोग महाराज या दोन उत्तुंग व्यक्तींच्या सहवासाचा सोनोपंतांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यांना मुंबई विद्यापीठाची प्रल्हाद सीताराम स्कॉलरशिप मिळाली आणि पुढे ते गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा विषय घेऊन एम.ए. तत्त्वज्ञान, अध्यात्म हे ग्रंथांत ठेवावयाचे विषय नाहीत. ते सरळ, सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य सोनोपंतांनी जन्मभर केले. पाश्च्यात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. त्याचे फलित म्हणजे त्यांचा प्लेटो व ज्ञानेश्वर यांच्यावरील ज्ञानदेव आणि प्लेटो हा तुलनात्मक ग्रंथ होय. संत-साहित्य प्रकाशन समितीवर त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. सोनोपंत जन्मभर काही सांगत राहिले. ज्यांनी ते ऐकले, अनुभवले, त्यांना आपल्यावर अमृताचा घडा ओतला गेल्याची अनुभूती आली, धन्यता वाटली. स. प. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाचा प्रारंभ त्यांच्या कीर्तनाने झाला. वारकरी पंथाचे ते आधारस्तंभ होते. भक्तिमार्गाला अद्ययावत शास्त्रशुद्ध कल्पनांची जोड देऊन सोनोपंतांनी या पंथाला व्यापक, नित्य, नवे, चैतन्ययुक्त आणि बुद्धिप्रामाण्यवादी रूप दिले.
त्यांनी ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले. ज्ञानदेव आणि प्लेटो, ईश्वरवाद, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, अभंग-संकीर्तन—भाग १,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले. तसेच अनेक ग्रंथांचे संपादनही केले.
ईश्वरवाद या ग्रंथात त्यांनी एकेश्वरवाद, नास्तिकवाद, देवधर्माचे भवितव्य व ईश्वरदर्शन या विषयांची चर्चा केली आहे.
अध्यात्मवादाची मूलतत्त्वे या ग्रंथात त्यांनी अध्यात्मवादाचा उगम तसेच विज्ञान, मानसशास्त्र, नीतिधर्म इत्यादी ज्ञानशाखांशी अध्यात्मवादाचा काय संबंध आहे, याचीही मीमांसा केली आहे.
श्रीज्ञानदेव चरित्र या ग्रंथात त्यांनी ज्ञानदेवांचे चरित्र आणि तत्त्वज्ञान यांच्याशी सामान्य वाचकांचा स्थूल परिचय व्हावा, या उद्देशाने ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह केला आहे.गीतेच्या श्लोकांवरील प्रवचने या ग्रंथात त्यांनी परमात्म्याचा अपरोक्षानुभव, त्याचे सर्वव्यापी दर्शन व त्याच्याशी समरसता ही कोणत्या साधनाने प्राप्त होते, हे सांगितले आहे.वारकरी पंथांचा इतिहास या ग्रंथात वारकरी पंथांचे ओझरते दर्शन व तत्त्वज्ञान यांची चर्चा त्यांनी केली आहे. आदरणीय मामांचा व दासगणु परिवाराशी खुप जवळचे व जिव्हाळ्याचे संबंध होते संतकवि दासगणू महाराजांच्या शंकराचार्य चरित्रास तसेच प्रा.अ दा.आठवले लिखित दासगणु चरित्रास दिलेली प्रस्तावना वाचनीय व चिंतनीय अशीच आहे. श्री सोनु मामांचा आणखी एक उपक्रम तो त्यांनी सुरु केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत दासबोध हा ग्रंथही अभ्यासक्रम ठेवला आहे. आदरणीय मामांच्या चरणी साष्टांग नमन.
टंकलेखन ः यो.नं.काटे
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।