पंढरपूर, दि. २७ (उ. मा. का.) :- राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी शासनामार्फत अनेक योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. पंढरपूरच्या आषाढी यात्रेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली. आरोग्य विभागाने या संधीचे सोने करत वारकऱ्यांप्रती असलेले आपले उत्तरदायित्व निभावले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी वाखरी येथील महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे वाखरी, ६५ एकर आणि गोपाळपूर या तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून वाखरी येथे शिबिराचे उद्घाटन आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी खासदार हेमंत पाटील, तेलंगणचे आमदार मुघरामजी दयानंद व श्री. मैनवपल्ली, आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक आर. डी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, नोडल अधिकारी डॉ. धर्मेंद्रकुमार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, डॉक्टर्स, आणि वारकरी भाविक उपस्थित होते.
आरोग्य मंत्री श्री. सावंत म्हणाले, राज्य शासनाने स्त्रीशक्ती आणि मातृशक्तीचा नेहमीच सन्मान केला आहे. राज्यातील महिला निरोगी राहाव्यात यासाठी माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबवून या अभियानात सुमारे चार कोटी 39 लाख महिलांची तपासणी केली. जागरूक पालक सदृढ बालक या अभियानातही आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. आता आरोग्य विभागामार्फत 18 वर्षावरील सर्व पुरुषांची तपासणी करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, आरोग्य वारी पंढरीच्या दारी या घोषवाक्यासह आरोग्य विभागाने वारकऱ्यांना सेवा देण्याचे काम केले आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून शासनाने गेल्या वर्षभरात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. पंढरपूरच्या आषाढी वारीत वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री स्वतः नियमित आढावा घेत आहेत, असेही खासदार श्री. शिंदे म्हणाले.
राज्य शासनाने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले. आषाढी वारीमध्ये आयोजित केलेले महाआरोग्य शिबीर एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरेल यात शंका नाही, असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने महिलांसाठी विविध योजना राबवून स्त्री शक्ती आणि मातृशक्तीचा सन्मान केला आहे. ५ कोटी महिलांची आरोग्य तपासणी करून 65 हजार महिलांचे मोफत ऑपरेशन केले आहे. एसटीमध्ये 50 टक्के सवलतही दिली आहे, असे ज्योती वाघमारे यांनी सांगितले.
प्रा. शिवाजी सावंत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या घोषवाक्यासह आरोग्य विभाग या शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेत कार्यरत असल्याचे सांगितले.
शिबीर २७ ते २९ जून या कालावधीत २४ तास चालू राहणार आहे. शिबिरामध्ये १० लाख लोकांची मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार व गंभीर आजाराच्या रुग्णाकरिता महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये संदर्भ सेवा देऊन मोफत उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
शिबीर उद्घाटनानंतर श्री. सावंत यांच्यासह मान्यवरांनी शिबिरातील विविध तपासणी कक्षात भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला.