करकंब (प्रतिनिधी) :- करकंब येथील अनवते वस्ती येथे बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून सुमारे पावणे चार लाख रुपयांची चोरी झाल्याने करकंब सह परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार करकंब येथील करकंब -टेंभुर्णी रोडवर असलेल्या अनवते वस्ती नजीक राहणारे बाळू पांडुरंग शिंदे हे दुपारी चार ते सहा या वेळेत घराला कुलूप लावून शेतात काम करीत होते ते घरी आल्यावर त्यांना कोणीतरी घराचे कुलूप तोडल्याचे लक्षात येताच त्यांनी पाहिले तर सर्व साहित्य विस्कटलेले दिसले. नंतर त्यांनी कपाट पाहतात तर चोरी झाल्याचे लक्षात आले. ही घटना बुधवार दि.10 रोजी दुपारी चार ते सहा या वेळेदरम्यान घडली आहे.
चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील रोख रक्कम 1 लाख 52 हजार, व सोन्याचे 2 लाख 15 हजाराचे दागिने कोणीतरी चोरले असल्याची फिर्याद करकंब पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. या घटनेची माहिती समजताच पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी- विक्रम कदम व करकंब पो.स्टेशनचे स.पो.नि.निलेश तारू व करकंब पोलीसांच्या टीमने तातडीने घटनास्थळी तत्काळ भेट दिली असून पुढील तपास पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी - विक्रम कदम यांच्या सूचनेनुसार व करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि- निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय फुगारे हे करीत आहेत.