"नारद" हा शब्द उच्चारताच आपल्या भावविश्वासमोर एक मूर्ती उभी राहते ती हरी कीर्तनात निमग्न असलेली, गळ्यात वीणा, निरंतर भ्रमंती आणि ओठावर " नारायण, नारायण नारायण" असे अखंड नामस्मरण करणारे कुशाग्र बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेले देवर्षी नारद. त्यांची आज जयंती.
नारदाला प्रवेश नाही असे स्थान त्रिलोक्यात नाही. "नारायण नारायणचा" उद्घोष करीत सप्तस्वर्गापासून ते
सप्तपाळताळा पर्यंत अनिरुद्ध संचार करणारे भगवान नारद. त्यांच्या बुद्धीला समस्त ब्रम्हांडाचे राजकारण आणि समाजकारण अचूकपणे कळते. देव, दानव आणि मानव सर्वांच्या परिस्थितीचे स्वयंप्रेरणेने आकलन करतात. त्यांनी दानवांचे गर्वहरण केले. तर देवांना गर्वाची बाधा होऊ दिली नाही.
भगवान विष्णू शेषशय्येवर असले काय, वा भगवान शिव समाधीत असले काय किंवा देवांचा राजा इंद्र नृत्योत्सवात निमग्न असला काय नारदाची भेट नाकारण्याची प्राज्ञा कोणीच करू शकत नाही असं व्यक्तिमत्व.
भारतातील ऋषी-मुनींनीपैकी नारदमुनींनाच फक्त ब्रम्हर्षी ही पदवी मिळाली होती. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात नारदमुनी देवी-देवतांना मध्ये संवादाचे माध्यम होते. सदैव सतर्क राहणारे नारद हे ब्रह्मदेवाच्या मुलांपैकी सनक, सनंदन सनत आणि सनातन या पेक्षा लहान होते. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे आकाश-पाताळ आणि पृथ्वी या तिन्ही लोकी भ्रमण करून नारद देव, संत-महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमाणसाशी संवाद साधून त्यांची सुखदुःखे ,अडचणी जाणून घेत, नारद मुनी देवांना जेवढे प्रिय होते. तेवढे राक्षसांनाही होते. समाजहित हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. नारदमुनींनी मानापमानाची कधीच पर्वा केली नाही. त्यांना विश्वातील आद्य पत्रकार म्हणून ओळखले जाते.
देवर्षी नारदांच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत. धर्मशास्त्रावरच्या पहिल्या दहा ग्रंथकारांमध्ये नारदांचा उल्लेख आहे.
भक्तीयोगाचे व्याख्यान करणारा सूत्र ग्रंथ म्हणजे नारदभक्तीसूत्रे एकूण ८४ सूत्रे आहेत. अथतो भक्ती व्याख्यास्याम: इथून पुढे भक्तीचे व्याख्यान करीत आहे हे पहिले सूत्र नारदांनी सांगितले. भक्ती हे सर्व साधनांमध्ये उत्तमातले उत्तम साधन आहे. मानवाने भगवत भजन करून भगवंतांच्या कृपेला पात्र व्हावे असा उपदेश करीत निरंतर भ्रमंती करीत असतात. पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात विष्णुपदा जवळ नारदाचे मंदिर आहे.
"नार" या संस्कृत शब्दाचा अर्थ "पाणी". नारद म्हणजे पाणी देणारा. वाटसरूसाठी, पांथस्थयांसाठी उन्हाळ्यात रस्त्यावर पाणपोई उभा करण्याची संकल्पना राबवणारे नारद ऋषी. नारदीय कीर्तन परंपरेचे जनक. महर्षी व्यास, वाल्मिकी, प्रल्हाद,ध्रुव यांचे गुरू. सर्व विषयात पारंगत, संगीताचे महागुरू, वीणा हे त्यांचे प्रिय वाद्य. सर्व शास्त्रांवर त्यांचे प्रभुत्व प्रचंड विद्याव्यासंगी, कुशाग्र बुद्धिमत्ता, संभाषण चतुर, समाजहितैषीसदा, जगन मित्र, अजात शत्रू असणाऱ्यांना देवर्षी नारद यांच्याविषयी...
सर्वदा हरिकीर्तन । ब्रह्मसुत करी आपण । तेणें नारद तोचि नारायेण । बोलिजेत आहे ॥
वैशाख कृष्ण प्रतिपदा ही नारद मुनींची जन्मतिथी.
ब्रह्मर्षी नारद यांच्या चरणी विनम्र वंदन.
- संतोष भोसेकर
💐💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏